Artist Profile
Neeta Bhosale - Premium Artist
Woolen Art Gift Articles Rukhavat
✦ Since 1990

मराठी | हिंदी | English

About

छंदातून उभा राहिलेला स्वावलंबनाचा सुंदर प्रवास

काही छंद हे केवळ विरंगुळा नसतात, तर आयुष्याला नवी दिशा देणारे ठरतात. लोकरीच्या विणकामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नीता ताईंचा प्रवास त्याचाच प्रेरणादायी आदर्श आहे. शालेय जीवनातील सातवी-आठवी इयत्तेत, म्हणजेच १९९० सालापासून , त्यांनी लोकरीच्या विणकामाला सुरुवात केली. सुरुवातीला हा केवळ आवडीचा छंद होता; परंतु हळूहळू त्याच छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले आणि त्यातून आर्थिक आधारही मिळू लागला. सिंगल वूमन म्हणून आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टींचा सुंदर समतोल साधला आहे. आजही त्या नियमित सेवा (Job) सांभाळत ग्राहकांच्या ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करतात. हा प्रवास सहज नव्हता. सुरुवातीच्या काळात सोशल मीडियाची सुविधा नव्हती, मोबाईल फोनचा वापरही मर्यादित होता आणि नवीन डिझाइन्स सहज उपलब्ध होत नव्हत्या. दोन-तीन महिन्यांत एखादीच ऑर्डर मिळायची. मात्र, मेहनत, सातत्य आणि कामावरील प्रेम यांच्या जोरावर त्यांनी हा प्रवास कायम ठेवला.

आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सोशल मीडियामुळे त्यांच्या कलेला अधिक व्यापक व्यासपीठ मिळाले आहे. नवीन डिझाइन्स, ग्राहकांशी थेट संवाद आणि दूरवरच्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या संधी वाढल्या आहेत. या बदलाचा त्यांनी सकारात्मक स्वीकार करून आपल्या कलेला आधुनिकतेची जोड दिली आहे. त्यांच्या हस्तकलेमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक आणि उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे. लोकरीपासून बनवलेली नावासह दरवाजाची तोरणे, सुंदर रुमाल, बटवे, पर्स, करंजी आणि मोदकाच्या कलात्मक प्रतिकृती , तसेच रुखवतासाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू त्या अत्यंत बारकाईने तयार करतात. प्रत्येक वस्तूमध्ये त्यांचा अनुभव, कल्पकता आणि दर्जेदार कामाची छाप स्पष्टपणे दिसून येते.

नीता ताईंच्या मनात केवळ व्यवसाय वाढवण्याचेच नव्हे, तर कला पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचेही स्वप्न आहे. त्यामुळे जानेवारी २०२७ पासून विणकामाचे प्रशिक्षण वर्ग (Classes) सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. या माध्यमातून अधिकाधिक महिलांना आणि हस्तकला प्रेमींना स्वावलंबनाची नवी दिशा मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. याशिवाय, त्यांच्या हस्तनिर्मित कलाकृती भारताबाहेरील ग्राहकांपर्यंत पोहोचाव्यात आणि भारतीय हस्तकलेचा गौरव जागतिक स्तरावर व्हावा, हे त्यांचे मोठे स्वप्न आहे.

छंद, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उभा राहिलेला हा कलाप्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रत्येक हस्तनिर्मित वस्तूमध्ये केवळ लोकरीचे धागे नसतात, तर त्यामध्ये संघर्ष, स्वावलंबन आणि कलेवरील निस्सीम प्रेम विणलेले असते. त्यांच्या कलेला अधिकाधिक लोकांचे प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद लाभोत, हीच शुभेच्छा.

अशाच विविध महिला कलाकारांच्या प्रेरणादायी संपूर्ण कथा दिवाळी अंकामध्ये Amazon Kindle वर उपलब्ध आहे. कलाकौशल्य दिवाळी विशेषांक 2025

Art Portfolio

Woolen Art
×